महंत ऐसें राष्ट्र म्हणोनि महाराष्ट्र.
महाराष्ट्र मेले तरी राष्ट्र मेले।
मराठ्या विना राष्ट्र गाडा न चाले।
खरा वीर वैरी प्राधिनतेचा।
महाराष्ट्र आधार ह्या भारताचा।
असे महाराष्ट्राच्या व्यापकतेचे काव्य ऐकून धमन्यात नवे चैतन्य उफाळून येते. महाराष्ट्र म्हणताच शिवराय नजरेसमोर दिसतात. संतांची मांदियाळी आठवते. समाजसुधारक क्रांतिकारकांचं समर्पण नजरेसमोरून तरळून जातं. संयुक्त महाराष्ट्राचा लढा जिवंत होतो. पण ह्या महाराष्ट्राचा प्राचीन इतिहास तसा कमीच लोकांना माहिती असतो. मराठी भाषेचा इतिहास, इथल्या संस्कृतीचा प्रवास, इथले आचारधर्म सर्व काही अभ्यासाचे विषय आहेत. पण एक गोष्ट लक्ष्य वेधून घेते ती म्हणजे महाराष्ट्राच्या नावात असलेला राष्ट्र हा शब्द. चला तर मग ह्या नावाचा आणि महाराष्ट्राचा थोडा इतिहास समजून घेऊ. महाराष्ट्राचे उल्लेख, इथल्या राजवटी, इथले धर्म ह्या लेखातून आपण स्पर्श करून पाहणार आहोत.
महाराष्ट्र राज्य कसे अस्तित्वात आले ?
हा प्रांत तसा खूप काटक कणखर. त्यामुळे ह्याचे नावही तसेच सापडते. सर्वात प्रथम ऋग्वेदात ह्या भागाला राष्ट्र असे संबोधले आहे. अडीच ते तीन हजार वर्षे आधी स्पष्ट महाराष्ट्र असा उल्लेख सापडतो. इथे महाजनपदांच्या काळात महाराष्ट्राला अश्मक असे म्हटलेले दिसते. अश्मक म्हणजे कणखर किंवा दगडांचा कठीण प्रदेश. ह्याच काळात इथे अत्यंत महारथी माणसे होऊन गेले म्हणून त्याचा अपभ्रंश महारठ्ठ आणि नंतर महाराष्ट्र असा होतो. त्याच काळात महाराष्ट्राचे आपल्याला अनेक भाग दिसतात. यात परांत, अपरांत, दंडक, मुळक, विदर्भ, कुंतल असे. अपरांत म्हणजे कोकणपट्टी, परांत म्हणजे तळकोकण, दंडक असे नाशिक आणि आजूबाजूच्या परिसराला म्हटले आहे, मुळक म्हणजे मराठवाडा, तर आजचे विदर्भ त्याच नावाने ओळखले जायचे. कुंतल म्हणजे महाराष्ट्र कर्नाटक सीमेवरचा भाग. अनेक उल्लेखांपैकी अशोकाच्या शिलालेखात देखील महारठ्ठ महाराष्ट्र असे काही उल्लेख सापडतात. इथे राहणाऱ्या लोकांना तेव्हापासूनच मराठे असं म्हटलं जायचं. एका कवीने मराठी लोकांचे केलेले वर्णन असे
“दढं मढं सामलंगे कलह सालेन
दिन्हले गन्हिले उलविरे तत् मराठे”
म्हणजे दृढ मजबूत सावळ्या रंगाचे, कलह सलेन म्हणजे भांडकूदळ आणि दिले गेले उरले किती अशी भाषा करणारे व व्यवहाराला चोख असणारे मऱ्हाठे.
ह्या प्रांताची भाषा अर्थत मराठी भाषेला वेगळा इतिहास आहे. प्राचीन मराठी मधले ग्रंथ सप्तशती किंवा कथा सरीतसागर असे आहे. विशेष म्हणजे ह्यातला एक ग्रंथ सातवाहन राजा ‘हाल’ याने लिहिलेला आहे. भाषेचा इतका अभिमान की ज्ञानेश्वरांनी “माझा मराठाची बोलू कौतुके” असे उद्गार काढले. एकनाथांनी देखील “संस्कृत वाणी देवे केली, प्राकृत काय चोरापासूनि आली?” असा सवाल करत लोक भाषा टिकवली. मराठी भाषेचे अनेक ताम्रपट शिलालेख देखील आज उपलब्ध आहेत.
महानुभावांच्या ग्रंथात तर सरळ उल्लेख सापडतो की जिथे मराठी बोलली जाते तो महाराष्ट्र. “महंत ऐसें राष्ट्र म्हणोनि महाराष्ट्र” असे सुत्रपाठामध्ये उल्लेख आहेत. आज देखील महानुभाव मराठी भाषेचा आग्रह धरतात. एकनाथांनी ह्यालाच भर म्हणून, “माझी मराठी भाषा चोखडी” असे म्हटले. “इये मराठीचीये नगरी” म्हणत ज्ञानोबांनी महाराष्ट्रातली भाषा जिवंत ठेवली, तसेच ज्ञानेश्वरी आणि इतर ग्रंथ मराठी भाषेतून रचले. रामदास स्वामींनी देखील मराठा तितुका मेळवावा, असे उद्गार काढून महाराष्ट्र प्रांताचे व भाषेचे महत्व पटवून दिले.
महाराष्ट्राच्या साम्राज्यांचा विचार करता इथे मौर्यांचे राज्य होते. नंतर शालिवाहनांचे मोठे राज्य होते. हे राजे अत्यंत शूर आणि पराक्रमी होते. ह्यातला मुख्य राजा सातकर्णी जो आपला उल्लेख आईच्या नावाने म्हणजेच गौतमीपुत्र सातकर्णी असा करतो. ४०० वर्षांच्या शालिवाहनांच्या राज्यानंतर वाकाटक आणि नंतर चालुक्य ह्यांचे राज्य इथे उदयाला आल्याचे आपल्याला दिसते. पुढे सर्वात वैभवशाली काळ आणि मराठी भाषेला राजभाषेचा दर्जा मिळालेला काळ म्हणजे यादवांचा. ह्याच काळात मराठी भाषेचा विकास झालेला दिसतो. ह्या पूर्वी महाराष्ट्रात अत्यंत मोठ्या प्रमाणावर व्यापार चालायचा. एका रोम व्यापाऱ्याने त्याच्या पुस्तकात लिहिले आहे की तो महाराष्ट्रात असताना त्याला इथे एकही भिकारी दिसला नाही. आज देखील उत्खनन करतांना रोमन नाणी सापडतात. यादवांच्या नंतर मात्र बहामनी मुसलमानी राजवटी इथे असल्याचे दिसते आणि सर्वात प्रचलित व अभिमान वाटण्यासारखे राज्य म्हणजे शिवाजी महाराजांचे राज्य म्हणावे लागेल. पुढे पेशवे आणि नंतर इंग्रज असे एकूण ह्या राजवटींबाबत म्हणता येईल.
महाराष्ट्राला संतांचे माहेरघर म्हटलं तर वावगं ठरणार नाही. संत निवृत्तीनाथांपासून निळोबारायांपर्यंत वारकरी, तर चक्रधरांच्या महानुभाव आणि समर्थ रामदास स्वामींचा रामदासी संप्रदाय इथे दिसतात त्यामुळे अध्यात्मिक महत्व ह्या प्रांताला आहे. तसे अजून दोन संप्रदाय आहेत ते म्हणजे नाथ आणि दत्त संप्रदाय. इथे बौद्ध लेण्या, जैन लेण्या देखील आहेत. अनेक मंदिरं आणि धार्मिक ठिकाणांमुळे अध्यात्मिक वारसा महाराष्ट्र जपत आलेला आहे असे दिसते. अजंठा वेरूळच्या लेण्या मांगी तुंगी, अंकाईच्या लेण्या आणि विविध जैन मंदिरे व बौद्ध स्तूप महाराष्ट्राचे प्राचीन वैभव टिकवून आहेत. मुख्य प्रवाहात असलेला वारकरी संप्रदाय महाराष्ट्रात प्रिय असून ह्यात अनेक संत होऊन गेलेले दिसतात. इतर देवीदेवतांचे उपासक देखील महाराष्ट्रात आहेत.
ह्याच महाराष्ट्राच्या प्राचीन, सांस्कृतिक आणि इतर अध्यात्मिक बाबींमुळे, इथल्या आचारधर्मामुळे नि भाषेच्या स्वाभिमानामुळे संयुक्त महाराष्ट्राचा इतिहास देखील आपले लक्ष्य वेधून घेतो. हा रक्तरंजित इतिहास न भूतो न भविष्यती असा होता. ह्यात महानुभावांचे ग्रंथ व त्यात दिलेले महाराष्ट्राचे उल्लेख मदतीचा हात देतात. ते असे की महानुभावांच्या ‘श्रुती पाठ’ ह्या ग्रंथात महाराष्ट्र कशाला म्हणावे असे दिलेले आहे. एकूण त्यात खंडमंडळे म्हणजे विविध खंडांचे मंडळ दिले आहे आजच्या भाषेत छोटे छोटे प्रांत किंवा जिल्हे. तर त्यात असे वर्णन अढळते, “फलटणपासोनी दक्षिणेस, बालेघाटापर्यंत एक मंडळ, गोदावरी ते कृष्णेचे दुसरे मंडळ, मग मेघघाट नंतर वऱ्हाड. असे महंत राष्ट्र.” त्यात महाराष्ट्राचे पाच गुण देखील समाविष्ट आहेत.
सात्विक, सुखरूप, इष्टकारक, निर्दोष आणि सगुण अशी ह्याची थोरवी आहे. जो इतरांनाही थोर करतो तो महाराष्ट्र म्हणून “महाराष्ट्री असावे” असा संदेश त्या ग्रंथातून चक्रधर त्यांच्या शिष्यांना देतात. सोबतच ग्रँड डफ सारख्या इतिहासकारांच्या मते महारांचे राष्ट्र म्हणून महाराष्ट्र. अर्थ अनेक आहेत पण ऐतिहासिक दृष्ट्या हा प्रांत अत्यंत महंत व थोर दिसून येतो.
अशा ह्या महाराष्ट्रात मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र व्हावा म्हणून मोठा जनलढा उभा करावा लागला. तब्बल १०५ हुतात्म्यांचं बलिदान देऊन अखेर १ मे १९६० रोजी तो मुंबईसह संयुक्त महाराष्ट्र अस्तित्वात आला. अशा माझ्या राकट, कणखर आणि दगडांच्या देशासाठी, दिल्लीचेही तख्त राखणाऱ्या माझ्या प्रांतासाठी… “जय महाराष्ट्र”!
Source : Social Media
/*54745756836*/